Advertisement

Thursday, July 22, 2010

धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर



सनातन संस्थेच्या समष्टी कार्यातील आरंभीच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात `साधना आणि धर्मजागृती' या दोन्ही विषयांचे बिजारोपण केले; मात्र हा विषय उच्चरवाने समाजाला सांगण्याचा आरंभ ख्रिस्तब्द १९९७ मध्ये झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांमुळे झाला. शंभरहून अधिक झालेल्या या सभांचा काळ खरोखरंच रोमांचकारी होता. या काळातील अनेक घटना आजही दूरचित्रवाणी पाहिल्याप्रमाणे स्पष्टपणे डोळयांसमोरून सरकतात. इतक्या त्या मनात ठसल्या आहेत. अर्थात या सर्व घटना गुरुमाऊली प.पू. डॉक्टर यांच्या संबंधात आहेत. कसे होते, हे सोनेरी पान ?
संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
पूर्वार्ध
१. लेख लिहिण्यामागील पूर्वपिठिका आणि हेतू
१ अ. प.पू. डॉक्टर यांना त्यांच्या ऐतिहासिक कार्याच्या कर्तेपणाचाही विसर !
प.पू. डॉक्टर यांनी १९९७ साली किती जाहीर सभा घेतल्या, याची नेमकी संख्या एका लिखाणात नोंद करण्याच्या दृष्टीने एका साधकाने प.पू. डॉक्टर यांना विचारले. त्या वेळी प.पू. डॉक्टर यांनी या सभांचा आकडा ८-१० असा सांगितला. `हा आकडा १०० हून अधिक आहे', असे साधकाने सांगूनही प.पू. डॉक्टर यांनी `नाही...नाही इतक्या सभा झाल्या नाहीत', असे सांगितले. प.पू. डॉक्टर यांच्या या सभांना उपस्थित राहून ध्वनीचित्रीकरण करणारा साधक, या सभांचे व्यवस्थापन पहाणारे साधक यांना याविषयी विचारल्यावर `या सभांची संख्या १०० हून अधिक आहे', असे त्यांनी सांगितले. हे ऐकून काही न करता आत्मप्रौढी मिरवण्याची प्रथा पडलेल्या या जगात `करून सवरून नामानिराळे राहाण्याची' उच्च शिकवण कृतीतून देणारे गुरु लाभले, याविषयीची कृतज्ञता वाटली. त्यांनी घडवलेला हा इतिहास मानवजातीसाठी आणि धर्मजागृतीच्या कार्यात दीपस्तंभ ठरावा, या उद्देशाने शब्दबद्ध व्हावा, हाच या लेखामागील हेतू !
भव्य व्यासपीठ : मध्यभागी श्रीकृष्णार्जुनाचा पडदा तर डाव्या बाजूला श्रीराम आणि वीर हनुमान उजव्या बाजूला श्रीकृष्ण आणि परशुराम अशी राष्ट्र आणि धर्मविषयक कार्यास प्रेरणा देणारी व्यासपिठाची रचना
२. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचा इतिहास आणि स्वरूप !
२ अ. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा - सनातनच्या इतिहासातील एक सोनेरी पान ! : १९९७ हे वर्ष ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून गणले जाईल. सनातनच्या इतिहासात अशी अनेक सोनेरी पाने असतील, तरीही या पानाला विशेष महत्त्व असेल. याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांनी या वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांत फिरून १०० हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या. विषय होता `साधना आणि क्षात्रधर्म' ! या जाहीर सभा होण्यापूर्वीचे सनातनचे कार्य वैयक्‍तिक उन्नतीसाठी साधना आणि अध्यात्म इथपर्यंतच मर्यादित होते आणि ते चार भिंतींमध्येच मर्यादित होते. शाळेतील वर्ग किंवा अधिकाधिक एखादे सभागृह घेऊन अध्यात्माचा विषय मांडणे, इतकीच त्याची व्याप्‍ती होती; परंतु साधनेचे महत्त्व समाजातील सर्व लोकांना सांगण्यासाठी मोकळया पटांगणात मोठे व्यासपीठ उभारून जाहीर सभा घेण्याचा पहिलाच प्रयोग या सभांच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे तो यशस्वीही झाला; कारण प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक सभेला अपेक्षेपेक्षा अधिक लोक येत. जिल्ह्याच्या ठिकाणी होणार्‍या सभेला ८-१० सहस्र जिज्ञासू असत. सांगली येथील सभेला तर १२ सहस्र लोक उपस्थित होते, तर तालुका स्तरावरील सभेला ४ ते ५ सहस्र जिज्ञासू असत, हे विशेष !
२ आ. स्वार्थी नव्हे, नि:स्वार्थ हेतूने जाहीर सभांचे आयोजन !
निवडणुका जवळ आल्या की, पुढच्या पाच वर्षांसाठी खुर्ची मिळवण्याचे ध्येय बाळगून विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रचाराला बाहेर पडतात. त्यांच्या दिमतीला असते हेलिकॉप्टर किंवा विमान, गाड्यांचा ताफा, सहस्रो कार्यकर्ते आणि बक्कळ पैसा ! तरीही या पुढार्‍यांच्या `अमुक दिवसांत तमुक इतक्या सभा घेतल्या', अशी शेखी मिरवणार्‍या बातम्या वृत्तपत्रात छापून येतात. प.पू. डॉक्टर यांनी घेतलेल्या जाहीर सभांच्या प्रसारासाठी साधक संख्या अल्प होती, साधनसामग्रीची न्यूनता होती. महाप्रसाद, दर्शन, व्यावहारिक समस्या निवारण यांसारखी लौकिकातील कोणतीही आमिषे नव्हती. कोणताही बडेजाव न मिरवता दिवस-रात्र प्रवास करून प.पू. डॉक्टरांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी नि:स्वार्थ हेतूने घेतलेल्या सभांचे मोल किती असेल, याचा अंदाज राष्ट्र आणि धर्म यांसाठी पदरमोड करून समर्पित जीवन जगणार्‍या व्यक्‍तीलाच येईल.
छायाचित्रात जाहीर सभेत जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले
२ इ. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे स्वरूप !
२ इ १. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची व्याप्‍ती ! : प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या जिल्ह्यांत, तसेच गोवा, उत्तर कर्नाटक या ठिकाणी सभा घेतल्या. प्रत्येक जिल्ह्यात ७-८ सभा घेतल्या जात.
२ इ २. जाहीर सभांसाठी प.पू. डॉक्टरांसमवेत फिरणारे साहित्य ! : सभेच्या ठिकाणी लागणारे व्यासपीठ, कनात (बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा), प्रदर्शनाचे साहित्य, विद्युतजनित्र, ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत उपकरणे असे सभेसाठी लागणारे इत्यंभूत साहित्य असलेला टेम्पो या सर्व ठिकाणी जात असे आणि सभेची सिद्धता करत असे.
२ इ ३. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेला जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच !
२ इ ३ अ: पाच-सहा महिने चालू असलेली जाहीर सभांची पूर्वसिद्धता ! : या सभांसाठीच्या व्यासपिठाचा आकार सुमारे २० २० फुटांचा असे आणि उंचीही तितकीच असे. जिज्ञासूंची बैठक व्यवस्था किमान २०० फूट लांब आणि १०० फूट रूंद असे. प्रदर्शन कक्षाचा आकारही १०० फूट लांब आणि १५ फूट रूंद असे. या सभांची सिद्धता पाच-सहा महिने अगोदर चालू होती.
२ इ ३ आ. एके दिवशी उभा होणारा आणि काढता येणारा जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच ! : सभेसाठी उभारले जाणारे व्यासपीठ, जिज्ञासूंच्या बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा, प्रदर्शन कक्ष हे सर्व एकाच दिवशी उभे करून सभा झाल्यानंतर त्याच दिवशी काढणे सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने हा संपूर्ण संच निर्माण करण्यात आला होता. असे असूनही `यातील भव्यता घटली', असे कुठेच झाले नाही.
२ इ ३ इ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ उभारण्याचे प्रात्यक्षिक ! : विशेष म्हणजे हा संपूर्ण संच निर्माण करण्याच्या सर्व बारीकसारीक प्रक्रियेमध्ये प.पू. डॉक्टरांनी कटाक्षाने लक्ष घातले होते. `व्यासपीठ कशा प्रकारे लगेचच उभारता येईल', `किती वेळात उभे राहील', अशा सर्व प्रक्रियेचे प्रात्यक्षिक त्यांनी साधकांकडून करून घेतले होते. या प्रक्रियेतील व्यावसायिक माहिती आणि अनुभव कोणाही साधकाला नव्हता. सर्व साधक प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सर्व कृती करायचे आणि त्यात यशही यायचे.
२ इ ४. अविश्रांत होणार्‍या जाहीर सभा ! : एका जिल्ह्यात ८-९ सभा आयोजित केल्या असल्यास त्या सभा `प्रतिदिन एका ठिकाणी', अशा प्रकारे एकही दिवस विश्रांती न घेता होत असत. मग उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एक दिवस दिला जात असे आणि पुढे दुसर्‍या जिल्ह्यातील सभा चालू होत. सभा संपल्यानंतर सर्व साहित्य गुंडाळून रातोरात पुढच्या सभेसाठी जावे लागत असे. तिथे पहाटे ५ वाजल्यापासून ते सायंकाळी सभा चालू होण्याच्या क्षणापर्यंत सभास्थळ उभारण्यात व्यतीत होत असे. हे सभास्थळ उभारण्यात साधारणत: ६० ते ७० साधक ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता अव्याहत सेवा करत.
२ इ ५. सर्व वर्गांतील लोकांकरता सुलभ ठरणारी जाहीर सभांची वेळ ! : सभांची वेळही अशी निवडण्यात येत असे की, लोक नोकरीवरून सुटल्यावर सभेला येऊ शकत आणि महिलावर्ग स्वयंपाक करण्याच्या वेळेपर्यंत घरी पोहोचे. त्यामुळे या सभांना सर्व वर्गांतील लोकांची उपस्थिती असे.
२ इ ६. सभेपूर्वी ग्रामदेवता आणि स्थानदेवता यांचे आशीर्वाद घेणे : प.पू. डॉक्टर प्रत्येक सभेच्या पूर्वी त्या शहरातील स्थानदेवता वा ग्रामदेवता यांच्या देवस्थानात जाऊन आशीर्वाद घेत असत. स्थानदेवता वा ग्रामदेवता यांचा आशीर्वाद घेणे आणि सभेत अडथळे आणू पहाणार्‍या शक्‍तींपासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रार्थना करणे, असा हेतू ते सांगत !
छायाचित्रात जाहीर सभेतील उपस्थित जिज्ञासू
२ इ ७. बहुसंख्य जिज्ञासूंच्या भाषेप्रमाणे जाहीर सभेत मार्गदर्शन ! : प.पू. डॉक्टरांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सभा घेतल्या. मराठी भाषिकांची संख्या अल्प असणार्‍या ठिकाणी सभा चालू होण्यापूर्वी ते जिज्ञासूंना `सभा हिंदीतून घ्यायची कि इंग्रजीतून' हे विचारत आणि जिज्ञासूंना हात वर करण्यास सांगत. बहुसंख्य जिज्ञासू जी भाषा सांगत, त्या भाषेतून ते प्रवचन करत.
२ इ ८. सभेप्रमाणे मार्गदर्शनाच्या मांडणीत परिवर्तन ! : सभेचा विषय `साधना आणि क्षात्रधर्म' असला, तरी समोरील श्रोतावर्ग पाहून प.पू. डॉक्टर विषयाची मांडणी करत. प्रत्येक सभेच्या ठिकाणी नवीन सूत्रे असत, उदा. पहिल्या सभेत गुरुकृपायोगानुसार साधनेची ४ तत्त्वे सांगितली होती. सर्व सभा होईपर्यंत गुरुकृपायोगानुसार साधनेची एकूण ७ तत्त्वे अंतर्भूत झाली होती.
२ इ ९. उपस्थितांसाठी भारतीय बैठक, तर वृद्धांसाठी आसंदी ! : एरव्हीच्या सभांमध्ये मान्यवर किंवा वार्ताहर यांसाठी दिसणारी वेगळी आसनव्यवस्था या सभांच्या वेळी नसे. सर्वांना भारतीय बैठकीतच बसावे लागे. त्यामुळे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हेदेखील वेगळया आसनव्यवस्थेची अपेक्षा न ठेवता भारतीय बैठकीतच बसत; मात्र वृद्ध, अपंग यांना आसंदी (खुर्ची) दिली जात असे.
२ इ १०. बाहेरून आलेल्या साधकांची सभेपूर्वी व्यासपिठावरून होणारी ओळख आणि त्यामागील प.पू. डॉक्टरांचा हेतू ! : सभेची पूर्वसिद्धता शिकण्यासाठी पुढील सभा असणार्‍या जिल्ह्यांतील साधकही सभास्थानी येत. त्या सर्वांची ओळख त्यांना व्यासपिठावर बोलवून करून देण्यात येत असे. `सनातन संस्थेचे कार्य किती व्यापक प्रमाणात चालू आहे, याची समाजाला माहिती व्हावी', हा प.पू. डॉक्टरांचा असे करण्याचा हेतू होता.
३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !
३ अ. सभांच्या माध्यमांतून दिसलेला प.पू. डॉक्टरांचा साधेपणा ! : या सभा समाजाला अध्यात्माकडे वळवण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या. त्यामुळे एरव्हीच्या सभांमध्ये दिसणार्‍या भपकेबाजपणाला प.पू. डॉक्टरांनी आवर्जून दूर ठेवले होते. हे दर्शवणार्‍या काही घटना पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ १. हार-तुर्‍यांनी सत्कार नसणे : प.पू. डॉक्टर व्यासपिठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्थानिकांपैकी एक साधक सपत्‍निक येऊन प.पू. डॉक्टरांना तिलक लावून पुष्पगुच्छ देत असे. या कार्यक्रमात हार-तुर्‍यांचा शिरकाव प.पू. डॉक्टरांनी कधीही होऊ दिला नाही. त्यांना देण्यात येणारे पुष्पगुच्छही बाजारातून विकत आणलेला नसे, तर साधकांनी स्वहस्ते बनवलेला असे. अर्थात ही साधेपणाची शिकवण प.पू. डॉक्टरांनीच साधकांना दिली होती.
३ अ २. या सभांमध्ये त्यांनी कधी पुढारी, नेता अशा दुसर्‍या कोणाकडून सत्कार करून घेतला नाही.
३ अ ३. या सभेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपिठाच्या मधोमध प.पू. डॉक्टरांना बसण्यासाठी साधी खुर्ची असायची. (सध्या राजकारण्यांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर दोन-तीन ओळीत बसणारी नेतेमंडळी पाहून सवय झालेल्या लोकांना याचे थोडे आश्चर्यच वाटे.)
३ अ ४. व्यासपिठामागील पडद्यावर प.पू. डॉक्टरांचे नाव नसणे : त्यांच्या खुर्चीच्या शेजारी छोटीशी फुलदाणी, पेन, कागद, पाणी ठेवण्यासाठी टी-पॉय ठेवलेला असायचा. मागे व्यासपीठ व्यापून टाकेल, इतका भव्य कृष्णार्जुनाचा पडदा लावला जाई; मात्र त्यावर प.पू. डॉक्टर यांचे नाव वा अन्य कोणताही उल्लेख नव्हता.
३ अ ५. जाहीर सभांसाठीची नियमावली ही प.पू. डॉक्टर निर्मितच ! : प.पू. डॉक्टर जाहीर सभांच्या अगोदर नियमावली सिद्ध करत, उदा. `निवासाच्या ठिकाणी जेवणासाठी खिचडी आणि पापड', `सभेमधे हार नको; पुष्पगुच्छ द्यावे', `जेथे मी जाईन, तेथे पाद्यपूजा नको' इत्यादी.
३ अ ६. स्वयंनिर्मित नियमांचे पालन प.पू. डॉक्टर स्वत: करत असल्याची काही उदाहरणे
३ अ ६ अ. पाद्यपूजा न स्वीकारणे : गुहागर (जिल्हा रत्‍नागिरी) येथे सभा संपल्यानंतर प.पू. डॉक्टरांची रहाण्याची व्यवस्था ज्या साधकांकडे होती, त्या साधकाने प.पू. डॉक्टरांची पाद्यपूजा करण्याची सिद्धता केली होती. ते पाहून प.पू. डॉक्टर तडक मागे फिरले आणि गाडीत बसून चिपळूण येथे दुसर्‍या साधकाकडे रहाण्यासाठी निघून गेले. त्या वेळी रात्रीचे १० वाजले होते.
३ अ ६ आ. सजावट केलेल्या पलंगावर विश्रांती न घेणे : गणपतीपुळे येथे प.पू. डॉक्टरांच्या निवासाचे नियोजन ज्या साधकाकडे होते, त्या साधकाने प.पू. डॉक्टर ज्या पलंगावर झोपणार होते, त्या पलंगाच्या चारही बाजूला सत्यनारायण पूजेच्या वेळी लावतात, तसे केळीचे खांब आणि पाने लावली होती. ते पहाताच प.पू. डॉक्टर तेथे न रहाता व्यासपीठ उभारणार्‍या साधकांची निवासव्यवस्था केली होती, त्या ठिकाणी पूर्ण दिवस राहिले.
३ आ. जाहीर सभांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी साधकांना दिलेली वक्‍तशीरपणाची शिकवण !
३ आ १. वेळेत चालू होणार्‍या आणि संपणार्‍या जाहीर सभा ! : जाहीर सभांच्या कालावधीत
प.पू. डॉक्टरांकडून अनेक गुण साधकांना शिकायला मिळाले. त्यामध्ये `वक्‍तशीरपणा' हा गुण प्राधान्याने सांगावासा वाटतो. या शंभर सभांमध्ये सर्वच सभा जाहीर केलेल्या वेळी चालू होत आणि संपत.
प.पू. डॉक्टर व्यासपिठावर पोहोचायला वा अन्य कोणत्या कारणासाठी सभा ५ मिनिटे उशिरा चालू झाली, असे झाले नाही किंवा विषय संपवायला ५ मिनिटे उशीर लागला किंवा वेळ संपत आली; म्हणून विषय आवरता घेतला किंवा थोडा अधिक गतीने घेतला असेही झाले नाही; म्हणून साधक या सभांचा प्रचार करतांनाच समाजाला सांगत, `आमची सभा वेळेत चालू होईल आणि वेळेत संपेल.'
३ आ २. सभा वेळेत चालू करण्याविषयीचा प.पू. डॉक्टरांचा काटेकोरपणा ! : सभा वेळेत चालू करण्याविषयी प.पू. डॉक्टर किती काटेकोर होते, हे दर्शवणारा प्रसंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सभेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. कुडाळ येथील सभेला येण्यासाठी प.पू. डॉक्टर सकाळी ५ वाजता मुंबईहून निघाले. तेव्हा त्यांना ताप आला होता. अशक्‍तपणामुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हते. तरीही ते चारचाकीने १२ तास प्रवास करून सभेला आरंभ होण्यापूर्वी १५ मिनिटे सभास्थानी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अल्पाहार किंवा चहा-पाणी न घेता ते थेट व्यासपिठावर जाऊन बसले आणि प्रवचन पूर्ण करूनच उठले.
३ आ ३. उशिरा चालू झालेल्या एका सभेत उपस्थितांची क्षमा मागणारे प.पू. डॉक्टर ! : या वक्‍तशीरपणाला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील सभा अपवाद ठरली. ही सभा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा चालू झाली. साधकांच्या नियोजनातील चुकीमुळे हा उशीर झाला होता. तरीही प.पू. डॉक्टरांनी प्रवचनाच्या आरंभीच उशीर झाल्याविषयी उपस्थितांकडे क्षमा मागितली होती.

No comments:

Post a Comment