Advertisement

Showing posts with label Artificial Intelligence. Show all posts
Showing posts with label Artificial Intelligence. Show all posts

Thursday, May 18, 2023

कृत्रिम बुद्धीमत्ता शेवटी कृत्रिमच !


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्‍वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे. चॅट म्हणजे मराठीत चर्चा ! येथे एका कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या यंत्रसदृश्य रोबोट, संगणक अथवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूशी संवाद साधला जाईल. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संबंधित रोबोट अथवा यंत्र तुम्हाला हव्या त्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे काही सेकंदांमध्ये देऊ शकणार आहे. तंत्रज्ञानातील पुढच्या आवृत्त्यांमध्ये अचूकतेने अधिकाधिक प्रश्‍नांची उत्तरे न्यूनतम अल्प कालावधीत देण्याचा प्रयत्न राहील.

तंत्रज्ञानाच्या निर्मात्यांकडूनच धोक्याची सूचना

चॅट जीपीटी यातील एक वेगळे तंत्रज्ञान म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाच्या साहाय्याने पुढे आले, तरी काही वर्षांपासून आपण ते वेगवेगळ्या प्रकारे वापरत आहोत. ‘अ‍ॅमेझॉन अलेक्सा’, ‘अ‍ॅपल सीरी’, ‘गूगल असिस्टंट’ या सर्व कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून बनवलेल्या संगणकीय प्रणाली आहेत. भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावरील ‘आस्क दिशा’ ही सुविधाही त्याचाच प्रकार आहे. चॅट जीपीटीमुळे याला एक चांगले प्रारूप प्राप्त होऊन विविध क्षेत्रांतील आस्थापनांना त्याचा लाभ झाला असला, तरी त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचीच चर्चा अधिक झाल्याने एक प्रकारे त्याच्या भविष्याविषयी भय निर्माण झाले आहे. ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे अध्यक्ष इलॉन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यास उत्सुक असतात. काही मासांपूर्वी त्यांनी एका माकडाच्या मेंदूत चीप बसवून माकडही त्याद्वारे संगणक हाताळू शकतो, असे जगाला दाखवले. हीच चीप ‘मानवी मेंदूत बसवल्यास मानवाची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढू शकेल’, असे त्यांचे म्हणणे आहे. याचा दुसरा अर्थ मानवाच्या नैसर्गिक क्रियांमध्ये हस्तक्षेप करून ‘प्रोग्रॅम’ला हवे तसे करू देणे, असा होतो. मस्क यांच्या या संशोधनावर टीका झाली, तरी मस्क यांनी त्याकडे लक्ष न देता संशोधन चालूच ठेवले. हेच मस्क महाशय आता चॅट जीपीटीच्या विरोधात आहेत. ‘ओपन एआय’ने चॅट जीपीटी शोधले त्याचे मस्क पूर्वी सहसंस्थापक होते. इलॉन मस्क यांनी नुकतेच ‘भविष्यात मानवी जीवनासाठी एआय धोका आहे. तरी त्याचे अनेक लाभ असले, तरी तो मोठा धोका आहे. एआयवरील संशोधनावर कुणीतरी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे’, असे सांगितले. इटलीने चॅट जीपीटीवर बंदी घातली असून युरोपातील देश बंदी घालण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सांगितले की, ‘एआय’मुळे संपूर्ण मानवी जीवनाला धोका आहे, दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान अधिक भयानक होत चालले आहे आणि मानवाच्याही पुढे जाईल. स्वत:च सिद्ध केलेल्या तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त करत हिंटन यांनी गूगलची नोकरीही सोडली आहे. या तंत्रज्ञानाची दाहकता त्याच्या निर्माणकर्त्यांनीच सांगितली असली, तरी अन्य आस्थापने, व्यावसायिक संस्था ‘एआय’चा त्यांच्या लाभासाठी उपयोग करत आहेत.

अमेरिकेकडून दक्षता !

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या देशातील सर्व मोठ्या तंत्रज्ञान आस्थापनांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत अमेरिकेच्या प्रशासनाने आस्थापनांना ‘एआय ही धोक्याची घंटा ठरू नये. वापरकर्त्याची गोपनीयता हेच प्राधान्य असेल. देशविघातक गोष्टींना खतपाणी घालू नये’, असे बजावले आहे. चीन याच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर भारताशी युद्ध करण्याची सिद्धता करत आहे. कृत्रिम बुद्धीमता असलेले ‘कृत्रिम सैनिक (रोबोट)’ भारताच्या सीमेवर तैनात केले असल्याचे वृत्त आहे. ‘एआय’चा धोका हा कर्मचारी कपात होईल, बेरोजगारी वाढेल, यादृष्टीने घेतला जात आहे. याला पुष्कळ अवकाश आहे.

विवेक जागृत हवा !

कृत्रिम बुद्धीमत्तेत मुख्य अडचण अशी आहे की, सर्वसाधारण मनुष्याला एखादा प्रश्‍न विचारला, तर तो प्रश्‍नकर्त्याच्या हेतूविषयी विश्‍लेषण करून त्याला तेच उत्तर वेगळ्या प्रकारे देऊ शकतो, उत्तर टाळू शकतो; मात्र कृत्रिम बुद्धीमत्ता असलेले यंत्र असे विश्‍लेषण कसे करू शकेल ? त्यामुळे कोणत्या हेतूने प्रश्‍न विचारला आहे, यापेक्षा उत्तर जेवढ्या जलद शक्य आहे, तेवढ्या जलद देण्याकडे यंत्राचा कल राहील. येथेच धोका असू शकतो. जगातील कोणतीही माहिती गूगल आपल्याला संबंधित लिंक्स शोधून देते. त्या लिंक्समधून आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी आपल्याला वाचनासाठी वेळ द्यावा लागतो. ‘एआय’मध्ये तीच माहिती नेमकेपणाने आणि अचूक मिळते. एखाद्या व्यक्तीची संपूर्ण माहिती अगदी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह मिळवणे, काही धोकादायक वस्तू सिद्ध करण्याची माहिती उदा. बाँब बनवणे; महाविद्यालय, विद्यालय यांच्या परीक्षांच्या वेळी प्रश्‍नपत्रिकेतील उत्तरे मिळवणे, मुलाखतीच्या वेळी प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे, औषधे देणे, एखाद्यावर वैयक्तिक आक्रमण करणे, देशातील गोपनीय माहिती उघड करणे इत्यादी कृतींसाठी वापर झाल्यास ‘एआय’ अधिक धोकादायक होऊ शकतो. आपल्याला ‘तुझा विवेक जागृत आहे का ? विवेकाला स्मरून बोल, वाग, असे बोलण्याची पद्धत आहे. या पार्श्‍वभूमीवर यंत्राचा विचार केल्यास त्याचा असा विवेक जागृत करता येईल का ? तात्पर्य कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी संशोधन करतांना ते मर्यादित क्षेत्रांसाठी विचार करून आणि तेही सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून करणे आवश्यक आहे; यासाठी प्रथम विवेक जागृत करणारी साधनाच करणे आवश्यक आहे.