Advertisement

Saturday, May 1, 2010

महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला तरी...!

महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला ! त्याला आमचे अभिवादन !
एखादी व्यक्ती पन्नास वर्षांची होते, तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या जीवनातील तो आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या भावनांच्या उत्साहाला मर्यादा रहात नाहीत आणि तो क्षण कधीच संपू नये, असे सर्वांना वाटायला लागते.
महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला, त्याविषयीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उदयापासून पन्नाशीला पोहोचेपर्यंत त्याला पहाणारी जनता महाराष्ट्र भूमीवर आहे. देश स्वतंत्र झाला, असे म्हटल्यावर स्वातंत्र्यापूर्वी काय होते आणि स्वातंत्र्य कसे मिळाले, हे जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होते. तद्वतच महाराष्ट्र पन्नास वर्षांचा झाला म्हणजे त्याचा जन्म कसा झाला आणि त्याच्या जन्मापूर्वी काय होते, हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. `छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र', अशी मराठी जनतेची भावुक श्रद्धा आहे. छत्रपतींनी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी घेतलेले कष्ट डोळयासमोर उभे केले म्हणजे या राज्याचे जतन आणि सेवा करणे, हे आपल्या जीवनातील एक अटळ कर्तव्य आहे, अशी भावना निर्माण होते. महाराष्ट्र शूरांचा आहे, तो मर्दांचा आहे, तो धारातीर्थी पडणाऱ्यांचा आहे, तो संतांचा आहे आणि तो हिंदूंचा आहे. महाराष्ट्राची ही सगळी वैशिष्ट्ये त्याच्या इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात यायला लागतात. विलक्षण योग्यतेची ही वैशिष्ट्ये कोणा दुसऱ्या राज्याला लाभली असतील, असे वाटत नाही. मराठी भाषिकांना मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जो लढा द्यावा लागला, तो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि मराठीद्वेष्ट्या काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात होता. मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा घाट महाराष्ट्र काँग्रेसमधील लाचार मराठी नेत्यांसकट त्या वेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घातला होता. नेहरूंपेक्षा महाराष्ट्र मोठा नाही, असे म्हणण्यापर्यंत काँग्रेसमधील या लाचार मराठी नेत्यांची मजल गेली होती. या लाचार नेत्यांकडून काँग्रेसमध्ये चालणाऱ्या या व्यक्तीपूजेच्या राजकारणात `मराठीच्या अस्मितेचे दर्शन होणे अशक्य होते.' त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती या नावाने विरोधकांचे जे संघटन होते, त्याचेच तेवढे प्रयत्न आशादायी वाटत होते. अर्थात या समितीच्या प्रयत्नांना तोड नव्हती, असे म्हणून विस्तारभयास्तव समितीच्या कार्याचा सविस्तर परामर्श घेण्याचे टाळून महाराष्ट्र उदयास आल्यानंतरच्या कालावधीकडे वळता येईल.

आजचा महाराष्ट्र !
भाषेच्या निकषावर राज्याची निर्मिती करण्यामागे `त्या प्रदेशाचा भाषेच्या आधारावर संस्कृती जोपासनेसह सर्वांगीण विकास' हा प्रमुख हेतू होता. भारतीय राज्यघटनेत निधर्मी राज्यप्रणालीचे जे कलम आहे त्याचा भावार्थ योग्य त्या पद्धतीने लावला गेला नाही. देशातील जनतेला तिच्या धर्माप्रमाणे म्हणा किंवा पंथाप्रमाणे म्हणा, आचरण ठेवण्याची मुभा घटनेने दिलेली आहे. असे असतांना निधर्मी या शब्दाचे राजकारणात स्तोम माजवण्यात आले आणि त्याचा आधार घेऊन काँग्रेसच्या शासनाने महाराष्ट्राची उत्कृष्ट परंपरा आणि संस्कृती यांकडे दुर्लक्ष करण्याचे बंधन स्वत:वर घालून घेतले. पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा आषाढी-कार्तिकीला करणार, हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला मंदिरातील पैसा सरकार जमा करणार; परंतु मंदिराचा लाभ हिंदु भाविकांना करून देण्याकडे लक्ष देणार नाही, ही काँग्रेसच्या नेत्यांची नीती झाली. जनतेचे हित ओळखून त्याप्रमाणे कृती करता न येणाऱ्यांना राज्यकर्ता म्हणता येत नाही. राज्यात अत्यंत पवित्र आणि भाविकांची नितांत श्रद्धा असलेली जी देवस्थाने आहेत, त्यांना कह्यात घेऊन त्यांच्या उत्पन्नाचा विनियोग मनमानीपणे करून जनतेच्या अर्पणभावाचा अनादर करण्याचे वाईट काम या सरकारकडून होत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देशातील सर्वाधिक संत महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी दाखवलेल्या जीवनमार्गाचे अनुकरण आज जनता करत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी येथील समाधी जीर्णावस्थेत जाऊ दिली जाते आणि महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या अफझलखानाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे राज्यशासन जीवाचे रान करते. धार्मिक श्रद्धा हा मराठी माणसाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो मराठी माणसाचा अंगीभूत गुण आहे. काँगे्रसच्या शासनाला आपली जनता ओळखता आली नाही आणि निधर्मी शब्दाच्या दबावाखाली राहून भरकटलेल्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हाताशी धरून `श्रद्ध' जनांना सैरभैर करून टाकण्याचा निंद्य प्रकार काँग्रेस शासन करत आहे. राज्यघटनेचा हवाला देऊन निधर्मी राज्यकारभार करण्याच्या नादात हे शासन काहीही करू शकते. हिंदूंनी एवढेच लक्षात घ्यायला हवे की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला धार्मिक बैठक होती. महाराज नसते तर प्रत्येकाची सुंता झाली असती, या कवी भूषण यांच्या काव्यपंक्तीत सर्वकाही आहे. आजचा महाराष्ट्र कोठे आहे ? निधर्मी या शब्दाचे आपल्या जीवनातील स्थान काय ? घटनेने दिलेेले अधिकार कोणते ? पुरोगामित्वाच्या शासनाच्या सूत्रामुळे आपल्या श्रद्धास्थानांना बाधा पोहोचते का ?, अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मराठी जनांनी स्वत:च्या चिंतनाने मिळवली पाहिजेत.

हे व्हायला हवे
महाराष्ट्राबद्दल सर्वसामान्य जनतेचे एक स्वप्न आहे, ते म्हणजे राजा जनतेला पित्यासमान वाटावा, अशी त्याची धोरणे असावीत. राज्यातील जनतेला न्याय मिळत आहे, असे जाणवायला हवे. श्रद्धाळू जनतेला पोषक असे वातावरण राज्यात आहे, असे जाणवायला हवे. गुन्हेगाराला शिक्षा आणि गुणवंतांचे कौतुक, अशी राज्याची रीत असावी. राज्याविषयी स्वाभिमान वाटेल आणि राज्याच्या उत्कर्षासाठी जनतेला कृतीप्रवण व्हावेसे वाटेल, असे वातावरण हवे.नेते भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, अशी शंका चुकूनही जनतेच्या मनात येणार नाही, अशी स्थिती हवी. आजच्या सुवर्णमहोत्सवाच्या मुहुर्तावर जनतेने लोकशाहीतील तिच्या अधिकाराखाली या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. महाराष्ट्राला समकालीन असलेल्या गुजरात राज्याकडे देशातील सर्वांत विकसित राज्य म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्राने देशातील आदर्श राज्य म्हणून नावारूपास येण्यासाठी जनतेचा अभ्युदय हा एकमेव निकष आहे. त्यासाठी राज्यशासनाला कोणते प्रयास घ्यावे लागतील, त्यावर आज चिंतन चालू झाले तरी पुरेसे आहे.

No comments:

Post a Comment