Tuesday, December 16, 2008

सर्वच सापांकडे संशयाने पहाणे आवश्यक !

आटपाट नगर होते. तेथे एक सदासुखी नावाचा राजा राज्य करत होता. प्रजा मात्र बिचारी दु:खी, कष्टी नि वेगवेगळया संकटांना तोंड देत होती. हे थोडे झाले म्हणून कि काय त्या राज्यात सर्पांनी उच्छाद मांडला. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या. लोक जीव मुठीत धरून जगू लागले. साप दिसला की, लोक जमा व्हायचे आणि दगड, काठी हाती मिळेल त्याने सापाला मारायचा प्रयत्‍न करायचे. साप कधी पळून जायचा, तर कधी मारला जायचा. त्यात कधी कधी बिनविषारी सापही मारला जायचा. इकडे सरकारचे पित्त खवळले. सरकारी अधिकारी व राजाचे निकटवर्ती सभा घेऊ लागले. संधी मिळेल तिकडे सांगू लागले, ``या नगराच्या शूर बांधवानो, सर्पदंशामुळे ज्यांच्या घरी मृत्यू घडलेला आहे, त्यांच्या दु:खात सरकारही सहभागी आहेच. अशा दु:खद घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तींना सरकार ३ लाख रुपयांची मदत देणार आहे. पैशाने ही हानी भरून निघणारी नाही, याची कल्पनादेखील सरकारला आहे; पण लक्षात घ्या सर्पांचा हा प्रश्‍न आपल्या नगरापुरताच मर्यादित नाही. हे सर्पांचे संकट वैश्‍विक आहे. `हिंसेने हिंसा वाढते' हे विसरू नका आणि हे बघा, घडलेल्या सर्व घटनांमध्ये विषारी सापच चावला असला, तरी सर्वच साप विषारी नसतात. फक्‍त ५ जातीचेच साप विषारी असतात; म्हणून सर्वच सापांकडे संशयाने बघू नका, अशी सर्व नागरिकांना विनंती आहे. साप दिसला कि मार हे योग्य नाही. आपल्या राज्याचे ब्रीद लक्षात ठेवा. `शंभर विषारी साप सुटले, तरी चालतील; पण एकाही बिनविषारी सापाला इजा होता कामा नाही.' विषारी साप दिसला, तर लगेच सरकारला व सुरक्षा कर्मचार्‍याला कळवा. सरकारची कामे तुम्ही तुमच्या हाती घेऊ नका. जनतेने सहकार्य केल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल.''

एक श्रोता : पण साहेब विषारी आणि बिनविषारी साप ओळखायचा कसा, ते सांगा ना ?
पण श्रोत्याचा हा प्रश्‍न ऐकण्यासाठी राजाच्या अधिकार्‍याकडे वेळ कुठे होता ? एका सर्पमित्रालाच साप चावल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी अधिकारी निघून गेला होता !
- श्री. माधव बिवलकर, नौपाडा, ठाणे.

1 comments:

साधक said...

खूप छान लिहिले आहे. उदाहरण अगदी योग्य घेतले आहे.

Post a Comment